शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:30 AM2023-01-24T11:30:59+5:302023-01-24T11:31:09+5:30
वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात काँग्रेस निर्णय घेईल
पुणे : वंचित विकास आघाडी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र, त्याचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात काँग्रेस निर्णय घेईल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे. यामुळे राजकीय अभ्यासकांनी भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, सध्याच्या राज्यपालांनी महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा, महिलांचा सतत अपमान केला. त्यांची हकालपट्टीच केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानासाठी पुण्यात आले असताना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध केला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. पटोले म्हणाले, मला मोकळे करा असे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले आहे. राज्यपालांचा संबंध राष्ट्रपतींबरोबर येत असतो. मात्र, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यपालभवन हे राजकारणाचे केंद्र केले. त्यामुळेच त्यांना पंतप्रधानांना पत्र लिहावेसे वाटले असावे.
उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद ही त्यांच्यात झालेल्या युतीसाठी होती. त्याचा महाविकास आघाडीबरोबर संबंध नाही. माझे ठाकरे यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. त्यांना मी सांगितले की वंचितचे काय म्हणणे आहे, प्रस्ताव काय आहे ते आमच्याकडे लेखी आले की त्यावर पक्षात निर्णय घेता येईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी हात से हात जोडो असा कार्यक्रम दिला. त्याची सुरुवात आम्ही करतो आहोत. भाजपवर आम्ही आरोपपत्र तयार केले आहे. ते जनतेच्या न्यायालयात या मोहिमेच्या माध्यमातून सादर करू, असे पटोले यांनी सांगितले.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे १० पेक्षा जास्तजण इच्छुक
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आमच्याकडे १० पेक्षा जास्तजण इच्छुक आहेत. त्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. कोल्हापूर, पंढरपूरमध्ये असे प्रयोग झाले. आम्ही येत्या २ ते ३ तारखेपर्यंत निर्णय जाहीर करू. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस