पुणे - इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची... हे गाणं आपल्या ओठांवर अनेकदा येतं. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असलेलं आळंदी हे संत परंपरेनुसार अतिशय पवित्र स्थान आहे. तर, राज्यातून लाखो भाविकही या स्थळाला भेट देतात. देशातील महत्त्वाच्या अध्यात्मिक स्थळांपैकी एक असलेल्या आळंदीत भक्तीचा श्वास, संतांची शिकवण आहे. म्हणूनच येथील मंदिराबाहेर अष्टगंध विकणाऱ्या चिमुकल्यांमध्येही ती शिकवण आणि संस्कार दिसून आले. आपल्याला सापडलेले मंगळसुत्र त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन जमा केले.
पूजा भामरे असं या चिमुकलीचं नाव असून ती आळंदीतील मंदिराबाहेर येणाऱ्या भाविकांच्या कपाळी अष्टगंध लावून 1-2 रुपयाने पै पै गोळा करते. कपाळी टिळा लावल्यानंतर भाविक 1 ते 2 रुपये तिच्या ताटात टाकतात, त्यातच खुश होणाऱ्या पुजाने तिच्या कृतीतून आळंदीच्या पावन भूमीचं महत्त्वच अधोरेखित केलं आहे. परिसरात अष्टगंधासाठी फिरताना तिला सापडलेलं सोन्याचं मंगळसुत्र तिने थेट पोलीस स्टेशनला जाऊन जमा केलं. तिच्या या निरागस आणि निस्वार्थ भावनेचं पोलिसांनीही कौतुक केलंय. पोलीस उपायुक्त मंचर इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी या मुलांचं कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. तसेच ज्या महिलेचं मंगळसूत्र हरवलं त्या महिलेने आळंदी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
पूजासह तिचे बालमित्र अथर्व आणि स्वरा हेही भाविकांना अष्टगंध लावून आपला छोटा व्यवसाय करतात. या व्यवसायातून दिवसभर फिरल्यानंतर त्यांना 200 ते 300 रुपये मिळतात. तरीही, त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत सोन्याचं मंगळसुत्र पोलिसांना दिलं. त्यामुळे, आळंदीच्या पावन भूमिचे संस्कारच त्यांच्या कृतीतून दिसून आल्याची चर्चा परिसरात होत आहे.