राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 08:02 PM2023-07-07T20:02:08+5:302023-07-07T20:31:58+5:30

पक्षाचे वरिष्ठ अचानकपणे निर्णय घेऊन पक्षातून बाहेर पडतात, त्यांना समर्थन करणारे कार्यकर्ते नेहमी अडकतात

The split of NCP is giving opportunities to new activists; Entry into new groups is done without fear | राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश

राष्ट्रवादीच्या फुटीमुळे नवीन कार्यकर्त्यांना मिळतेय संधी; बेधडकपणे होतायेत नव्या गटात प्रवेश

googlenewsNext

पुणे: महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभेनंतर राज्यात महाविकास आघडीची सत्ता आली. अजित पवारांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून कार्यभार सांभाळण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर ते पुण्याचे पालकमंत्रीही झाले. पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर जाऊन अजितदादांनी काम केले. त्यामुळे पुण्यातून राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून अजितदादांकडे पाहिले जाते. तर बारामतीकरांची त्यांनाच जास्त पसंती आहे. आणि शरद पवार हे राष्ट्रीय राजकारण पाहत होते. त्यामुळे सद्यस्थितीत शरद पवारांचा स्थानिक पातळीवर जास्त संपर्क नसल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. या घडामोडींमध्ये पुण्याला अजित दादांच्या गटाला पसंती असल्याचे दिसून आले आहे. तर त्यांच्या गटात आता नवे चेहरेही दिसू लागले आहेत. तर कार्यकर्तेही बेधडकपणे नव्या गटात प्रवेश करू लागले आहेत  

पुण्यातून अजित दादांच्या गटात दीपक मानकर, रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे पाटील, प्रदीप देशमुख या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष, दीपक मानकर यांना शहराध्यक्ष, रुपाली ठोंबरे पाटील यांना शहर प्रवक्त्या आणि प्रदीप देशमुख यांना शहर कार्याध्यक्ष अशी पदे देण्यात आली आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनाही अजित पवारांच्या गटात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळू लागली आहे. 

पक्ष फुटल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाल्याचे दिसून आले होते. अनेक जण लवकर भूमिकाही जाहीर करण्यास तयार नव्हते. मात्र पदांचा कार्यभार सोपवण्यास सुरुवात केल्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट निवडण्यास सुरुवात केली आहे. पुणे, बारामतीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थनाचे बॅनरही लागले आहेत. शरद पवारांच्या समर्थकांनी पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. तेव्हा प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक हे अजितदादांसोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. तसेच पुण्यातील अजित पवार सोडून ९ आमदारांपैकी ५ आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्यामुळे पुण्यातून अजितदादांचं पारडं जड असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

कार्यकर्त्यांना मिळणार संधी 

 पक्षाचे वरिष्ठ अचानकपणे निर्णय घेऊन पक्षातून बाहेर पडतात. त्यांना समर्थन करणारे कार्यकर्ते नेहमी अडकतात. साहेबांनी आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष निवडला अशा वेळी आपण काय करायचं असे विचार कार्यकर्त्यांच्या मनात येऊ लागतात. पक्ष मोठा कि आपले साहेब या विचारात ते अडकून राहतात. पण एक गट फुटून नवीन गट निर्माण झाल्याचा फायदा आता कार्यकर्त्यांना होऊ लागला आहे. तेही कुठला विचार न करता बेधडक नवीन गटात प्रवेश करताना दिसू लागले आहेत.           

शरद पवारांना पाठिंबा देणारे आमदार

- आमदार अशोक पवार (शिरूर) 
- आमदार चेतन तुपे (हडपसर) 

 अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार 

- आमदार दिलीप वळसे पाटील (आंबेगाव तालुका)
- आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड - आळंदी)
- आमदार दत्तात्रय भरणे (इंदापूर) 
- आमदार सुनील शेळके (मावळ) 
- आमदार सुनील टिंगरे (वडगाव शेरी) 

- आमदार अतुल बेनके (जुन्नर) 

- आमदार अण्णा बनसोडे (पिंपरी)

Web Title: The split of NCP is giving opportunities to new activists; Entry into new groups is done without fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.