पुणे : राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. अतिवृष्टी पाहणी दौरा अंतर्गत शेतकरी संवाद आणि शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. त्यानिमित्त आज (२७ ऑक्टोबर) पुण्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावाला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. शिरूर तालुक्यात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारचं इंजिन फेल असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही अनेकदा सांगतो होतो या घटनाबाह्य सरकारला सांगितलं की, या एअर बस निघून जाईल. मात्र हे घटनाबाह्य सरकारने हे एकलं नाही आणि आज महाराष्ट्राला पुन्हा एक धक्का बसला. एअर बस प्रकल्प राज्यातून गुजरातला गेला आहे. माझा सरकारला प्रश्न आहे, महाराष्ट्रात हुशार तरुण बेरोजगार नाहीत का? मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून का निघून गेले याचे उत्तर मिळणार आहे का? हा चौथा मोठा प्रकल्प आहे जो, महाराष्ट्रातून निघून गेला आहे. आमचं देखील डबल इंजिनचं सरकार होतं. तेव्हा ८० हजार कोटी आणि कोविडच्या काळात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. आता राज्य सरकारचे जे इंजिन आहे ते पण फेल इंजिन आहे. आता सर्व शेतकरी आणि बेरोजगारांनी 'देता की जाता' हेच राज्य सरकारला विचारचंय.