धायरी : महापालिकेचे लोकप्रतिनिधी असताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत होते. मात्र, सध्या असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नागरी समस्या सोडविण्यासाठी येणारे अपयश हे सातत्याने अधोरेखित होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निवडणूका घाव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे व स्वप्नपूर्ती महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा मोरे यांच्या वतीने जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक नागरिक, पुणे महानगरपालिकेतील अधिकारी यांना एकाच मंचावर आणण्यात आले. यावेळी नऱ्हे भागातील समस्यांवर कशा प्रकारे तोडगा काढण्यात येईल या विषयावर चर्चा करण्यात आली. नऱ्हे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सर्व अडचणी दूर केल्या जातील, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना भूपेंद्र मोरे म्हणाले की, नऱ्हे गाव महापालिकेत समाविष्ट करून बरेच महिने होत आले आहेत, तरी या भागातील नागरी समस्या जैसे थे आहेत. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने, उपोषण केले तरी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका ठोस भूमिका घेतना दिसत नाही.
यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, त्रिंबक मोकाशी, शुक्राभाऊ वांजळे, विकास दांगट पाटील, प्रभावती भूमकर, पोपटराव खेडेकर, राजाभाऊ वाडेकर, भावना पाटील, नेहा मोरे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.