पुणे: एमपीएसीतील वनाधिकारी परीक्षा पास होऊन ती राज्यात तिसरी आली होती. काही दिवसातच ती अधिकारी होणार होती. राज्यात तिसरी आल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीमध्ये दर्शनाचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी दर्शनाने उत्तम भाषणही केले होते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते अशी प्रतिक्रिया तिने भाषणांत दिली होती. घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल असल्याचे तिने भाषणात सांगितले होते. अधिकारी पदावर कार्यरत होण्याअगोदरच तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबाकडून हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या वडिलांनी या प्रकरणावर भाष्य करत राज्य सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी केली आहे.
एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्यानंतर अधिकारी होणार हे तिनं सांगितलं होत. त्यावेळी मला खूपच अभिमान वाटला होता. माझ्या मुलीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास केला होता. तिचा हा आनंद अल्पायुषी ठरला. सरकारने त्या आरोपीला अटक केली आहे. पण माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी राज्य सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तिचा मित्र राहुल हंडोरे फरार होता. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाला पोलिसांना मिळाल्यानंतर दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा दिसून आल्या होत्या. त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यावरून पोलिसांनी तातडीने अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे हा युवक पोलिसांच्या रडारवर होती. राहुल हा सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील रहिवासी असून तो देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे समोर आले होते. मात्र दर्शनाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याच्या क्षणापासून तो बेपत्ता असल्याने पोलिसांचा मुख्य संशय त्याच्यावरच होता. अखेर त्याला मुंबईतून अटक कारण्यात आली. त्यानंतर हंडोरे याने खून केल्याची कबुली दिली.