पुणे: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल” या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते बालगंधर्व सभागृहात पार पडले. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर आता वैशाली नागवडे आणि इतर महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली.याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. असे ट्विट राज्य महिला आयोगाने केले आहे.
दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टीका टिप्पणी चे सत्रही सुरु झाले आहे. रुपाली पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना करारा जवाब देंगे असा इशारा दिला आहे. मारहाण करणे हीच भाताची संस्कृती असल्याची त्यांनी टीका केली आहे. तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी रुपाली पाटील यांना उत्तर देत अंडी फेकणे ही राष्ट्रवादीची संस्कृती आहे का असं सवाल उपस्थित केला आहे. तर चंद्रकांत पाटलांनी सुद्धा रोहित पवार यांना ट्विटरवर उत्तर दिले आहे.