पवार कुटुंबीयांच्या पोहण्याच्या किश्श्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:58 PM2022-10-21T18:58:50+5:302022-10-21T19:08:18+5:30

कृषी विकास प्रतिष्ठानच्या ऑलिम्पिक जलतरण तलाव उद्घाटन कार्यक्रमावेळी सर्व जण एकत्र

The stories of Pawar family's swimming brought laughter in the hall | पवार कुटुंबीयांच्या पोहण्याच्या किश्श्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ

पवार कुटुंबीयांच्या पोहण्याच्या किश्श्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ

Next

बारामती : कृषी विकास प्रतिष्ठानच्या ऑलिम्पिक जलतरण तलाव उद्घाटनाचा कार्यक्रम पवार कुटुंबीयांच्या किश्श्यांनी गाजला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या कुटुंबात आम्हाला सर्वांनाच पोेहायला येते. कारण आम्हाला कोणताही ऑप्शन नव्हता. बारामतीला सुटीला आल्यावर ‘अजितदादां ’ चे वडील ’ तात्यासाहेब काका ’ आम्हाला २ वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या सर्व भावंडांना सर्वांना पोहायला लावत असत. सर्वांना ते ‘ कम्पलसरी ’ असे. ती ग्रुप ॲक्टिव्हिटीज असे. माझ्या लहानपणी स्वीमिंग पूल नव्हते. विहीर किंवा ओढ्यात पोहायला शिकावं लागत असे. ज्यांना जास्त पोहता यायचं त्यांना ओढ्यात आणि ज्यांना फारसे येत नाही, त्यांना डबा लावून विहिरीत ढकलून दिल जायचं त्यामुळे आमच्यापुढे पोहण्याशिवाय पर्यायच नसायचा.

‘ पाण्यात पडलं की पोहायला येत ’ ही म्हण पवार कुटुंबीयांतील मुलांना त्यामुळेच लागू पडते, असे त्यांनी मिश्कलपणे सांगितले. मुंबईला गेल्यावर बऱ्याच गोष्टी आईच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्या. याचे क्रेडिट मी आईलाच देईन कारण वडिलांना त्या काळात वेळच नसायचा, आई मला स्विमिंंग क्लासला घेऊन जायची, खासदार सुळे म्हणाल्या.

खासदार सुळे यांचा हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले, सुप्रियाने चुकून ओढ्याचा उल्लेख केला, तो ओढा नव्हता, तो कालव्यावरील काटेवाडी येथील ३३ फाटा होता. त्यात आम्ही पोहायचो. त्यात ऊन तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि त्या मातीत झोपायचो. राजूदादा तेच आठवण करुन देत होता, कशी मजा यायची. कसली मजा यायची..आता काय मजा येतीय ते बघू. माझं तर काही सांगूच नका. मी तर पाण्याला एवढा घाबरायचो की लांबूनच सगळ्यांची मजा बघत बसायचो. डबा बांधून वरुनच फेकून द्यायचे, मला तर भीती वाटायची, त्या डब्याचा दोर तुटला तर तर काय होईल. पण आमच्या वरिष्ठांना काही वाटायचं नाही. ते वरुन खाली फेकून द्यायचे. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतात. तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. खरच तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे. श्रीनिवास (अजित पवारांचे लहान बंधू) पोहायला शिकला आणि संध्याकाळी मला सांगितले ‘दादा’ मी पोहायला शिकलो. रात्रभर मला झोपच आली नाही, दुसऱ्या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो. धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण बिनशिकता कसं चालेल,असे लहानपणीचे किस्से अजित पवार यांनी सांगितल्यावर सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

राजूदादा आणि रोहितभाऊ दिसतात

आमदार रोहित पवार यांचे वडील व अजित पवार यांचे थोरले बंधू आजच्या कार्यक्रमाचे आयोजक असणाऱ्या कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन आहेत. अजितदादांच्या या फटकेबाजीतून राजेंद्र पवार ही सुटले नाहीत. त्यांना उद्देशून पवार म्हणाले, आज तर काय जीन्सची पँट, टी शर्ट, बूट बिट घातलेत. माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण मीच मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय. आता ‘तू’ आणि रोहित भाऊ भाऊ दिसतात. कुंती काय करायचं सांग, वहिनी कुठे गेल्या. आम्हाला सांगतच नाहीस, गप्प बसतोस, तू एकटं एकटं सगळं करतोस. मला, सुप्रियाला आणि रोहितला पण जरा सांग काय काय करायचं ते, आमचा फायदा काहीतरी कर, आम्ही तुझं तू सांगशील ते सगळं ऐकू, असं म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

... लहानपणी स्विमिंग पुलाची सुविधा नव्हती

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पवार म्हणाले, आमच्या लहानपणी स्विमिंग पुलाची सुविधा नव्हती. आम्हाला कालव्यात पोहायची सवय असे. तेथील एमएस हायस्कूलजवळ असणारा लोखंडी पुलावरून उडी मारणारा उत्तम जलतरणपटू मानला जात असे. तिथे पोहायला शिकायला येत असत. त्या काळात स्विमिंगची सुविधा म्हणजे कॅनॉल, तसेच खासगी स्वत: ची विहीर, असे मानले जात असल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

Web Title: The stories of Pawar family's swimming brought laughter in the hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.