पुणे: महाराष्ट्राचे सलगपणे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखतात. पाईप ओढणारे ( धुम्रपानातील पाईप) त्यांचे छायाचित्र अजूनही प्रसिद्ध होत असते. ते पट्टीचे शिकारी. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी निशाणा साधत नाही असे ते नेहमी सांगत. असे वसंतराव नाईक पुण्यात कायम येत असत. काँग्रेसशिवाय त्यांचा बराच मोठा निकटचा मित्र परिवार पुण्यात होता.
राज्यातील हरित क्रांतीचे जनक म्हणून नंतर त्यांची ओळख प्रस्थापित झाली. त्याची सुरूवात पुण्यातील एका प्रचारसभेतून झाली असे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले. पवार त्यावेळी युवक काँग्रेसचे काम करत. त्यानिमित्ताने त्यांचे सतत मुंबईत जाणेयेणे होत असे. त्यातूनच त्यांची वसंतराव नाईक यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. पवार यांनी सांगितले की नाईक यांना शेतीबद्दल प्रचंड प्रेम होते. मंत्रालयात असताना मुंबईत पहिला पाऊस झाला की लगेच खिशातून १०० रूपये काढत व शिपायाला देत, पेढे आणा व वाटा असे सांगत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी ही पद्धत कायम ठेवली.
एका विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ते आले होते. त्यावेळी मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांसाठी शनिवारवाड्याचे पटांगण हेच एकमेव ठिकाण होते. सगळ्याच नेत्यांच्या सभा तिथे होत. वसंतराव नाईकांचीही सभा तिथे झाली. त्यावेळी राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं होतं. दुसऱ्या राज्यावर अवलंबून रहावं लागत होतं. वसंतराव नाईकांना याची खंत होती. त्या सभेत बोलताना अचानक त्यांनी सांगितले की महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल.
प्रचारात बोललेले वाक्य म्हणून काही दिवसांनी सगळे ते विसरूनही गेले. नाईक मात्र ते विसरले नव्हते. त्यानंतर शेतीशी संबधित सर्वच विषयांवर त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. सिंचनाची जास्तीतजास्त व्यवस्था कशी होईल याकडे लक्ष दिले. शेतीतज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचेल अशा सुचना शेतीखात्याला दिल्या. त्यासाठी तज्ञ उपलब्ध करून दिले. आधुनिक शेतीची माहिती थेट शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घेतली.
या सगळ्या मोहिमेचा परिणाम म्हणून पुढच्या काही वर्षातच राज्याचे शेतीचे उत्पादन वाढले. सिंचनाखालील शेतीक्षेत्र वाढले. आधुनिक शेतीचा वापर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होऊ लागला व महाराष्ट्र खरोखरच अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालाच, शिवाय इतर राज्यांना मदतही करू लागला. त्यातूनच वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख मिळाली.