किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही

By राजू इनामदार | Published: November 4, 2024 12:33 PM2024-11-04T12:33:27+5:302024-11-04T12:34:15+5:30

सणस मैदानावर पूर्वी कधीतरी, तीन चार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली झाल्याने त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती

The story of the election in Pune! Indira Gandhi's campaign meeting at Sanas Maidan, there is no scope for an ant to enter | किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही

किस्सा पुण्यातील निवडणुकीचा! सणस मैदानावर इंदिरा गांधींची प्रचार सभा, मुंगी शिरायलाही वाव नाही

पुणे: सारसबागेतील बाबूराव सणस मैदान गच्च भरलेले! मुंगी शिरायलाही वाव नाही! समोर उंचावर स्टेज बांधलेले. त्यावर मोजक्याच खुर्च्या. साक्षात इंदिरा गांधींची प्रचार सभा होणार होती! मग त्यांच्या शेजारी खुर्चीवर दुसरे कोण बसणार? पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्यातील केंद्राचे प्रभारी असे मोजकेच लोक! बाकी काँग्रेसचे एकजात सगळे पदाधिकारी, त्यात राज्यातले अनेक वरिष्ठ, स्टेजखाली डी झोन मध्ये उभेच! 

आणि इंदिरा गांधी आल्या. स्टेजवरच्या बाकी लोकांच्या आधीच आल्या. त्यांच्याबरोबर त्यांचा स्विय सहायक. उंचावरच्या त्या स्टेजच्या पायऱ्या चढताना त्याचीही दमछाक झाली, पण इंदिरा गांधी मात्र झपझप सगळ्या पायऱ्या चढून वर पोहचल्याही. गर्दीला त्यांनी अभिवादन केले व थेट खुर्चीवर जाऊन बसल्या. त्यांनी नजर जरा आजूबाजूला फिरवली. काहीतरी ओळखीचे पाहतात असे वाटत होते. पण ओळख पटत नव्हती. असे झाल्यावर वाटणारी बैचैनी लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. दोन-तीन वेळा त्यांनी चारही बाजूंना नजर फिरवली.

हुरहुर काही कमी होईना. मग त्यांनी स्टेजच्या खाली पाहिले. ओळखीचे काही चेहरे दिसले. लगेचच त्यांनी मागे वळून स्विय सहायकाला बोलावले. त्याला काहीतरी सांगितले. तो स्टेजच्या पायर्यांजवळ थोडे खाली उतरून आला. उल्हास पवार! उनको उपर बुलाया है मँडमने! त्याने निरोप दिला. पटकन तो खाली थांबलेल्या नेत्यांजवळ पोहचलाही. उल्हास पवार तिथे थांबले होतेच. पटकन ते स्टेजजवळ आले. पायऱ्या चढून इंदिरा गांधीजवळ पोहचले. इंदिरा गांधी त्यांच्या कानाजवळ जाऊन काही बोलू लागल्या.बहुधा त्यांनी काहीतरी विचारले. पवार यांनी त्यांना काहीतरी सांगितले. 

या कानगोष्टी फार तर तीन चार मिनीटे सुरू होत्या, पण तेवढ्या काळात खाली थांबलेल्या नेत्यांचा जीव नुसता खालीवर होत होता. पवार तेव्हा तरूण पदाधिकारी होते. राज्य स्तरावर युवक काँग्रेसचे काम करत. पक्षात त्यांच्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ नेते होते. त्यांना वगळून मँडमनी पवारांना बोलवावे, त्यांच्याबरोबर कानगोष्टी कराव्यात याचे वैषम्य, खंत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

दरम्यान पवारांचे बोलणे संपले. इंदिरा गांधी यांच्या चेहऱ्यावरही हास्य पसरले. आधी दिसलेली हुरहुर संपली असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. पवार स्टेजवरून खाली उतरले. पून्हा गर्दीत जाऊन थांबले. त्यांच्याजवळ जाऊन, काय बोलल्या मँडम असे विचारणे चांगले दिसणार नव्हते. त्यामुळे सगळे एकप्रकारची बैचेनी चेहर्यावर घेऊनच थांबले होते.पवारांनीही त्यांना काहीच सांगितले नाही. तेव्हाच नाही तर नंतरही दोनचार दिवस त्यांनी सर्वांना तंगवतच ठेवले.

झाले असे होते की, त्याच मैदानावर पूर्वी कधीतरी, तीनचार वर्षांपूर्वी इंदिरा गांधीची सभा झाली होती. त्यामुळे त्यांना परिसर ओळखीचा वाटत होता, पण खात्री पटत नव्हती. युवक काँग्रेसच्या कामामुळे पवार सतत दिल्लीला जात, त्यामुळे त्यांचे नाव आणि चेहराही इंदिरा गांधींच्या लक्षात होता, स्टेजवरून खाली पाहिल्यावर त्यांना पवार दिसले, व त्यांनी त्यांना वर बोलावून घेतले. मैदानाचे नाव , पूर्वी कधी सभा झाली होती का असे विचारले.पवार यांनी त्यांना सगळी माहिती दिली आणि खाली आले. इतकेच झाले होते. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या तराजूतच मोजणाऱ्या  नेत्यांना पवार यांनी हे सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.तोपर्यंत मात्र पवारांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली.

Web Title: The story of the election in Pune! Indira Gandhi's campaign meeting at Sanas Maidan, there is no scope for an ant to enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.