- विश्वास मोरे
पिंपरी :इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत 'लोकमत'ने आवाज उठवल्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या वतीने नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चिखली, चिंबळी ते आळंदी परिसरातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील बीओडी आणि सीओडी, तसेच डिटर्जंट आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या देहू आणि आळंदी परिसरातून इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिनांक २ ते १५ जानेवारीपर्यंत इंद्रायणी नदी फेसाळत होती. याबाबत 'लोकमत'ने आवाज उठवला होता, तसेच पर्यावरणवादी संघटनांनी नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूने रसायनयुक्त पाणी नदीत जात नसल्याची खातरजमा महापालिकेने केली होती. मात्र, विरुद्ध भागात असणारे नाले थेटपणे नदीत सोडल्याचे दिसून आले.
या भागातील नाल्यांमुळे होते प्रदूषण
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास निघोजे, मोई, चिंबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण कारणीभूत आहे, तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत आणि या उद्योगांचे पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. या भागातील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण अधिक होत असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या भागातील पाण्याच्या प्रदूषणावर कारवाई करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे.
इंद्रायणी नदीवरील चिखली, चिंबळी आणि आळंदी या तीन भागांतील बीओडी, सीओडी, डीओ, डिटर्जंट आणि फॉस्फरेट अशा पाच गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डिटर्जंट आणि फॉस्फरेटचे प्रमाण, तसेच सीओडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.
इंद्रायणी नदी फेसाळली आहे, याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये अधिकाधिक प्रदूषण हे डिटर्जंटचे असल्याचे दिसून आले, तसेच सीओडी, बीओडी वाढल्याचे दिसून आले. या परिसरात नदीच्या परिसरातील नाल्यांची तपासणी प्रशासनाने करण्याची गरज आहे, तसेच त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. सांडपाणी नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखले तर प्रदूषण कमी होणार आहे.
- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधिकारी