पुणे: पगार वाढीच्या कारणास्तव पीएमपीच्या खासगी ठेकेदारांच्या चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले. ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी संप पुकारल्यानंतर चालकांनी तातडीने संप थांबवावा, असे आदेश राज्याच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पत्रकाद्वारे दिले होते. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील कंत्राटी चालकांनी पुकारलेला संप मागे घेतला. कोथरूड डेपोकडील कंत्राटी चालकांनी शनिवार २६ ऑगस्ट रोजी संप मागे घेतला तर पुणे स्टेशन व वाघोली डेपोकडील कंत्राटी चालकांनी रविवारी संप मागे घेतला. खासगी बस ठेकेदाराकडील कंत्राटी चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीएमएल च्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली होती. पगार वाढ न दिल्याने २०० चालक या संपात सहभागी झाले होते.