पुणे : संपूर्ण गावाचा आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. गावाने आमच्या कुटुंबाला एकप्रकारे वाळीतच टाकले आहे. या संपूर्ण घटनेची पोलिसांनी सविस्तर चौकशी करायला हवी. यात माध्यमांनी नाण्याची केवळ एकच बाजू मांडली आहे. घटनेतील सत्य समोर आले पाहिजे. त्यानंतर मग या घटनेत न्यायालयाने भावाला फाशी दिली तरी मान्य आहे, असे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या भावाने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, आम्हाला दूरध्वनीवरून धमक्या येत आहेत, त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी आरोपीचे वकील वाजिद खान बिडकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्रही पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे ते म्हणाले.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणेपोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातच सापळा रचून अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दि. १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, या घटनेनंतर सोशल मीडियावर पीडिता आणि आरोपीबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. आरोपीचे वकीलपत्र अँड. वाजिद खान बिडकर, अँड साजिद शाह यांनी घेतले आहे. त्यामुळे त्यांना धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेत पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण झाली असल्याचा दावा आरोपीच्या पोटे नामक आणखी एका वकिलांनी न्यायालयाबाहेर केला होता, याविषयी पत्रकारांनी छेडले असता, आम्ही आर्थिक देवाणघेवाण असे कधीही बोललो नाही. ज्या वकिलांनी हे विधान केले आहे. त्यांनाच विचारा असे स्पष्ट करीत वाजिद खान बिडकर यांनी प्रश्नाला बगल दिली. तसेच सोशल मीडिया वर आरोपीचा 'नराधम' म्हणून उल्लेख केला जातोय, आम्हाला देखील फोन येत आहेत. परंतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्ही केवळ कायदेशीर बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, भावाने आरोपीवर पूर्वी दाखल असलेल्या सहा गुन्हयांबद्दल माहिती असल्याचे सांगितले. भावावर पूर्वीचे गुन्हे दाखल असल्यामुळेच त्याने हे कृत्य केले असल्याचे गावक-यांना वाटत आहे. म्हणूनच त्याला पकडून देण्यासाठी गावक-यांनी मदत केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावाचा आमच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. या घटनेनंतर आमच्या गावात कुणी मुली द्यायला तयार होणार नाही असे वक्तव्य गावाच्या सरपंचांनी सोशल मीडियावर केले असल्याचेही आरोपीच्या भावाचे म्हणणे आहे.