Pune By Election: व्हाॅट्सॲपवरचं 'ते' निमंत्रण व्हायरल झालं अन् नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:28 PM2023-02-10T16:28:34+5:302023-02-10T16:34:13+5:30

राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात

The 'te' invitation on WhatsApp went viral and the leaders were enraged | Pune By Election: व्हाॅट्सॲपवरचं 'ते' निमंत्रण व्हायरल झालं अन् नेते संतापले

Pune By Election: व्हाॅट्सॲपवरचं 'ते' निमंत्रण व्हायरल झालं अन् नेते संतापले

googlenewsNext

राजू इनामदार 

- साधा फोटो तो काय?; पण राजकारणात त्यालाही फार महत्त्व असतं. त्यावरून लग्नात होत नाहीत असे रुसवेफुगवे, मानापमान होतात. आत्ता सुरू असलेल्या कसब्यातील पोटनिवडणुकीचंच घ्या ना. एका उमेदवाराने अर्ज भरायला जातानासाठीचं म्हणून निमंत्रण तयार केलं. आजच्या पद्धतीप्रमाणे ते व्हाॅट्सॲपवरचं होतं. पक्षाच्या सगळ्या नेत्यांची छायाचित्रं त्यात त्यानं घेतली. मित्रपक्षाच्या नेत्यांनाही त्यात आवर्जून स्थान दिलं. तरीही एक राहिलंच. त्याच्याच पक्षातील नेत्याचं. तेही निवडणूक असलेल्या मतदारसंघातल्याच एका नेत्याचं. माजी लोकप्रतिनिधी ते. मान्यवर, प्रसिद्ध व विद्वानही.

व्हाॅट्सॲपवरचं निमंत्रण ते. अवघ्या काही मिनिटात व्हायरल झालं. त्या नेत्यांनाही गेलं. संतापले ना ते. हा काय प्रकार? नेते नाराज झाले. गेले निघून परगावी. बसा म्हटले तुमचे तुम्हीच प्रचार करत. उमेदवारापर्यंत सगळी माहिती पोहचली. त्याच्या समर्थकांनाही समजली. निवडणुकीत असे कोणी नाराज होणं परवडत नाही. उमदेवाराला तर नाहीच नाही. मग काय तर? त्यांनी फोन केला, उचलला नाही. भेट घ्यावी म्हटले तर माणूस जागेवर नाही.

नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून सांगितले. तुम्हालाच शोधताहेत उमेदवार. नेते म्हणाले, होऊ दे त्याला जरा जाणीव. त्याशिवाय नाही येणार.’ आता उमेदवाराचे समर्थक त्या नेत्याचा ‘रूसवा’ काढण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीतरी करून त्यांना प्रचारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात.

सन १९८५ मध्येही काँग्रेसला मिळाला होता विजय 

बहुतेकांना वाटते की कसबा मतदारसंघ काँग्रेसने १९९२ च्या पोटनिवडणुकीतच जिंकला; पण सन १९८५ च्या नियमित निवडणुकीतही काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला होता. शिवसेनेचे त्यावेळचे कसब्यातील नगरसेवक असलेल्या काळोखे यांना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ या तेव्हाच्या काँग्रेसच्या बड्या हस्तीने १९८३ मध्ये पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर सन १९८५ मध्ये थेट विधानसभेची उमेदवारीच दिली. त्यावेळचे भाजपचे उमेदवार होते डॉ. अरविंद लेले. आधी २ वेळा ते विजयी झालेच होते. त्यामुळे त्यांचा विजय भाजपच्या सर्वांनाच सोपा वाटत होता. त्यात काळोखे बाहेरून आलेले. तशी टीकाही भाजपने केली. मतदानच काय पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हासुद्धा भाजपचे कार्यकर्ते अगदी निवांत होते. त्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये डॉ. लेले बरेच पुढे गेले. काळोखे मागेच राहिले. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी बरोबरी साधली व शेवटची फेरी झाली त्यावेळी ते काही हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

Web Title: The 'te' invitation on WhatsApp went viral and the leaders were enraged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.