पुणे : अशैक्षणिक कामांचे अतिरिक्त ओझे खांद्यावर टाकू नका, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने २७ डिसेंबर रोजी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील विविध २३ प्राथमिक शिक्षक संघटना सहभागी हाेणार आहेत, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
अशैक्षणिक कामांच्या सक्तीविरोधात राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमावर शिक्षकांनी यापूर्वीच बहिष्कार टाकलेला असतानाही शिक्षकांवर या कामाची सक्ती केली जात आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता सर्वेक्षण सुरू असून शिक्षण संचालक (योजना) या विभागामार्फत राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक काम करण्याची वारंवार सक्ती केली जात आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्र्यांसाेबत बैठक घेऊन विनंती केली आहे. तसेच याेजना विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांचीही संघटनांनी भेट घेत निवेदन दिले आहे.
शिक्षण हक्क कायदा- २००९ नुसार शिक्षकांना ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे बंधनकारक आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रम पूर्णपणे अशैक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम असल्याने त्यावर शिक्षक संघटनेने बहिष्कार टाकलेला आहे. असे असतानाही मागील आठ-दहा दिवसांपासून नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर सक्ती केली जात असल्याचे पुणे शहर शाखेचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले आणि विकास काटे यांनी सांगितले.
शिक्षकांना विनावेतन करू, वेतनवाढी रोखू, फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा धमकी वजा सूचना दिल्या जात आहेत. राज्य शासनाच्या या सक्तीविरुद्ध तसेच शिक्षकांवर लादलेल्या इतर अशैक्षणिक कामकाजाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी (दि. २७) शिक्षण आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल.
- केशवराव जाधव, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना