पुणे : तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, पुण्यातील आज किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर कमाल तापमान ३७ अंशावर आहे सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरातील किमान तापमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पुणेकरांना उष्णतेच्या झळ्या सहन कराव्या लागत आहेत. दुपारी दुचाकीवरून जाताना चांगलाच चटका जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे रात्री देखील गरम हवा त्रासदायक ठरत आहे.दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल.
यवतमाळमध्ये सर्वाधिक उष्णता -
२६-२७ मार्च दरम्यान कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. अहमदनगर येथे १३.७ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान आज नोंदवले गेले. तर सर्वाधिक कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअस यवतमाळ, अकोल्यात नोंदविण्यात आले.