पुणे : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका सहन केल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला पुणेकरांना सायंकाळनंतर सुटणाऱ्या थंड झुळकीमुळे दिलासा दिला होता. मात्र, रविवारी पुन्हा एकदा तापमानात मोठी वाढ झाली असून कमाल तापमान चाळिशीच्या पुढे गेले आहे. रविवारी कमाल तापमान ४०.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
एप्रिल महिन्यात सर्वत्र तापमानाचा कहर झाला होता. पुणे शहरातील कमाल तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले होते. एक मेपासून तापमानात उतार आला होता. २ मे रोजी कमाल तापमान ३७.९ अंशापर्यंत उतरले होते. सायंकाळच्या वेळी थंड वाऱ्याची झुळूक येऊ लागल्याने रात्री वातावरण आल्हाददायक वाटू लागले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होऊ लागली. शनिवारी कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यात आज पुन्हा वाढ होऊन तापमानाने पुन्हा एकदा चाळिशी ओलांडली आहे.
पुढील दोन दिवस कमाल तापमान ३९ अंशाच्या जवळपास राहणार असून सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.