पुणे: मॉन्सून परत गेल्यानंतर लगेच पुणे शहरात उकाडा जाणवू लागला आहे. किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने पुणेकरांना आताच उकाड्याने हैराण केले आहे. येत्या आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
सध्या मॉन्सून देशातून जवळपास परतीच्या वाटेवर गेला आहे. महाराष्ट्रातून पूर्णपणे निरोप घेतला आहे. मॉन्सून गेला आणि लगेच तापमानात उष्णता वाढू लागली आहे. पहाटे मात्र पुणे शहराच्या आसपास धुके दाटून येत आहे. धुक्यामुळे सकाळी छान वाटत असले, तरी दुपारी मात्र उकाडा चांगला वाढला आहे. शनिवारी (दि. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान ३४ अंशांच्या पुढे गेले होते. तसेच अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा, अमरावती आणि सोलापूर येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. राज्यामध्ये रविवारी (दि.८) मुख्यतः कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरातही आकाश निरभ्र राहणार आहे.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेश परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, या भागात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मणिपूरपासून पूर्व बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका वाढत आहे.