पुणे : कोरोनाच्या कालावधीत पुणे शहराचे हवा प्रदूषण कमी झाले होते. त्यानंतर सातत्याने हवा प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. देशातील १३१ प्रदूषित शहरांची यादी तयार केली असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. शहरीकरण आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. २०२२ मध्ये शिवाजीनगर आणि हडपसर भागात जास्त तर, कात्रज आणि पाषाण येथे प्रमाण कमी असल्याची नोंद झाली आहे.
शहराचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल स्थायी समिती समोर मांडण्यात आला आहे. पुणे शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागापेक्षा पूर्व आणि उत्तर भागात हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. नायट्रोजन डायऑक्साइडचे सर्वाधिक प्रमाण शिवाजीनगरमध्ये आहे. लोहगाव, हडपसर येथे जास्त, तर कात्रज आणि पाषाणमध्ये प्रमाण कमी आहे. कार्बन मोनोऑक्साइडचे सर्वाधिक प्रमाण लोहगाव आणि त्यानंतर शिवाजीनगर येथे आहे. सूक्ष्म धूलीकण शिवाजीनगर आणि हडपसरमध्ये तर अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण शिवाजीनगर भागात सर्वात जास्त आहे. नायट्राेजन डायऑक्साइडचे शिवाजीनगर, लोहगाव, हडपसर येथे प्रमाण जास्त आहे.
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना
राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये देशातील १३१ प्रदूषित शहरांची यादी तयार केली असून, त्यात पुण्याचा समावेश आहे. केंद्र सरकारने पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कामे केली जात आहेत.
कवडीपाठ येथे २६३ प्रजातींचे पक्षी
पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांसाठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई-बर्ड या वेबसाइटवरील मॅपिंग करण्यात आले आहेत. त्यात शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ येथे सर्वाधिक २६३ प्रजाती तर एआरएआय टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत.
हे विशेष
- शहरात प्रतिदिन २१०० ते २२०० मे. टन. घनकचरा आणि ९५० मे. टन ओला कचरा निर्माण हाेत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित- २०२०-२१ मध्ये पुणे शहराचा एकूण ऊर्जा वापर ४४६३.५९ मिलियन युनिट इतका होता. सन २०२१-२२ मध्ये वाढून ४९८२.८९ मिलियन युनिट इतका झाला.- रहिवासी भागात २०२०-२१ मध्ये ऊर्जा वापर २०४५ मिलियन युनिट इतका होता, तर २०२१-२२ मध्ये वाढून २९४४ मिलियन युनिट इतका झाला.
लोकसंख्या १ कोटी हाेणार, पाणी संकट उभे राहणार!
पुणे महापालिकेची हद्द ५१९ चौ. कि. मी. झाली आहे. सध्याचा जननदर आणि स्थलांतरणाचा वेग पाहता २०४७ पर्यंत शहराची लोकसंख्या १ कोटींच्या घरात पोहोचेल. महापालिकेच्यावतीने समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असली, तरी शहरातील १० टक्के निवासी भागात आताच पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाणी पुरवठ्याचे नवीन पर्याय न शोधल्यास निम्म्या पुणेकरांसमोर पाण्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.