पुणे : महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीला दिवसेंदिवस वेगळेच वळण येऊ लागले आहे. अजितदादांच्या महाबंडानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी होऊ लागली आहे. पुण्यात तर थेट "ठाकरे बंधूनी " एकत्र यावे चे फलक झळकले आहेत.
पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, टिळक रोड , कर्वे नगर, शिवणे व इतर ठिकाणी हे फलक झळकले आहेत. ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशा आशयाचे हे फलक आहेत. या फलकावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो महाराष्ट्राचा नकाशा आहे. ''महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल पाहून मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याबरोबरच अखंड महाराष्ट्राच्या भल्यासाठी, ऐक्यासाठी तमाम मराठी जनता ठाकरे बंधूनी एकत्र यावे अशी तीव्र मागणी करत असल्याचा मजूकर लिहिण्यात आलेला आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुटल चर्चा सुरू झाल्या. मनसेने ठाकरे गटाकडे युतीसाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर आता स्वत: मनसे नेते राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रीया दिली. ठाकरे गटासोबत युती संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीसाठी ठाकरे गटापुढे कोणताही प्रस्ताव ठेवला नसल्याचे स्पष्ट करत या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला युती संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितले. या चर्चांवर ठाकरे गटाकडूनही स्पष्टीकरण आले आहे, खासदार संजय राऊत यांनी सांगितले, असा कोणताही प्रस्ताव मनसेकडून आलेला नाही.