पुणे : सध्या मराठा आरक्षणासाठी काही तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. हे आरक्षण मिळेल किंवा मिळणार नाही; परंतु तुम्ही त्यासाठी आपले जीवन संपवू नका. ज्या तरुणांनी जीवन संपवले त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळीसारखा सण साजरा करता येणार नाही. म्हणून तुम्ही आरक्षणासाठी आत्महत्या करू नका तर लढा द्या, असे आवाहन आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा तरुणांना केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यात ३५ तरुणांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांना तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत बुधवारी जाहीर केली व त्याचे वाटप करण्यात आले. या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींचे पालकत्वही स्वीकारण्याची घाेषणा त्यांनी केली. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या कात्रज येथील कार्यालयात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित हाेते.
सावंत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले; परंतु त्यानंतरच्या तत्कालीन सरकारला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकविता आले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, तरुणांनी आत्महत्येचा पर्याय निवडू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लढायला शिकविले. त्यामुळे उलट शिवाजी महाराजांची शिकवण आत्मसात करून जीवनातील चढ-उताराच्या प्रसंगी लढा द्या.
आरक्षणाबाबत मी पंचांग घेऊन बसलाे नाही
आरक्षण मिळेल का? असे विचारले असता सावंत म्हणाले की, आरक्षण कधी मिळेल? याबाबत मी काही पंचांग घेऊन बसलेलाे नाही. आरक्षण हे मराठा समाजाचे अंतिम साध्य नसून, ते मिळेल की नाही? हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.