पुणे : अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाखांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. २३) केतन महादेव चौघुले (रा. कागल, कोल्हापूर) आणि शेखर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २२ एप्रिल २०२४ या कालावधीत पुण्यातील वेगवेगळ्या हॉटेल घडला आहे. याबाबत 34 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली आहे. त्यानुसार इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून घेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तरुणीच्या नकळत व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ महिलेला पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नोकरी करते. आरोपी केतन आणि फिर्यादी यांची डिसेंबर २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडितेला मेसेज व कॉल करुन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्य़ादी यांना पुण्यातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी आरोपीने त्याचा मित्र शेखर याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास तरुणीला भाग पाडले. त्यावेळी आरोपीने संबंध ठेवतानाचा व्हिडीओ फिर्यादी यांच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये काढला. केतन याने पीडित तरुणीला फोन करुन त्याने काढलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. पुण्यातील हॉटेलमध्ये मित्रासोबत संबंध ठेवतानाचा काढलेला अश्लील व्हिडीओ फिर्य़ादी यांच्या कार्य़ालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर पाठवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेने तक्रार देताच शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी केतन चौघुले याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल माने करीत आहेत.