पुणे : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार उद्यापासून (मंगळवार) रंगणार आहे. यापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी आखाड्यात उतरणार आहेत.
प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करून चुरशीची लढत देणारे हर्षद कोकाटे, सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, माउली जमदाडे, किरण भगत, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे, गणेश जगताप हे यंदाच्या 'महाराष्ट्र केसरी'साठी प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे एकापेक्षा एक सरस पैलवानातून ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा कोण उंचावणार? याकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील कुस्तीप्रेमी व कुस्ती क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या चर्चेतील प्रमुख लढतींसह एकूण १८ वजनी गटात ९५० पैलवान आपली ताकद आजमावणार आहेत. कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्यभरातून पैलवान दाखल झाले असून, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परिसरात लावलेले फलक, स्वागत कमानी यामुळे कोथरूडचा परिसर कुस्तीमय झाला आहे.
सकाळी ८ वाजल्यापासून वैद्यकीय तपासणी व 'अ' गटातील वजने घेण्यास सुरुवात होईल. दुपारी ४ ते ६ या वेळेत 'अ' गटातील माती व गादी विभागातील कुस्त्या होणार आहेत. कुस्तीच्या या महासंग्रामाला मंगळवारी (दि. १०) दुपारी ४ वाजल्यापासून सुरुवात होणार असली, तरी स्पर्धेचे मुख्य उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
विलास कथुरे, दिनेश गुंड यांच्यासह १५० ते २०० पंच स्पर्धेचे परीक्षण करतील. शंकर पुजारी यांच्या ओघवत्या शैलीतील समालोचन ऐकण्याची संधी कुस्तीप्रेमींना आहे. त्यांना तरुण फळीतील उमद्या समालोचकांची साथ मिळणार आहे.