पुणे: प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाचा अखेरचा टप्पा पुण्यात आजपासून रंगणार आहे. श्री शिवछत्रपती संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे तिसरा टप्पा सुरू होत आहे. हैदराबाद, नोएडा येथे दोन टप्पे रंगल्यानंतर पुण्यातील सामने अधिक चुरशीचे होणार आहेत, असे कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी सांगितले. पुण्यात ३ ते २४ डिसेंबरदरम्यान कबड्डी लीगचे सामने होणार आहेत.
पुणेरी पलटण हा गतविजेता संघ असून, आजही विजयी संघच आहे आणि त्याच पद्धतीने तो खेळतदेखील आहे. आम्हाला आता घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर खेळताना अधिक उत्साह येणार आहे. पुणेकरांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यास नक्कीच फायद्याचे ठरेल, असे पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी सांगितले.
आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. सर्व आघाड्यांवर आमचे खेळाडू कौशल्य पणाला लावत आहेत. कबड्डी हा सांघिक खेळ असून, आमचे खेळाडू या सांघिकतेचे चांगले प्रदर्शन करत असल्याचे पुणेरी पलटण संघाचा कर्णधार आकाश शिंदे याने सांगितले. यू मुंबा संघातील १४ लढतीत ११४ गुण पटकावणारा यशस्वी चढाईपटू पुण्याचा अजित चव्हाण म्हणाला की, घरच्या मैदानावर एका घरच्या संघाकडून दुसऱ्या घरच्या संघाविरुद्ध खेळताना मनावर दडपण असले तरी ते मैदानात दिसणार नाही. आम्ही विजयासाठीच खेळू असा निर्धार त्याने व्यक्त केला. पुण्याचा टप्पा २४ डिसेंबरला संपल्यानंतर येथेच २६ ते २८ डिसेंबरदरम्यान बाद फेरीचे सामने होणार आहेत. २९ डिसेंबरला येथेच अकराव्या हंगामाचा शेवट बघायला मिळणार आहे.