मनोहर बोडखे
दौंड: घुंगरांचा छनछनाट, ढोलकीची थाप तसेच लावण्यवतींचा शृंगार बाराही महिने अनुभवास येतो. दरम्यान ऐरवी शिट्ट्या आणि लावणी नृत्याच्या कलाविष्काराने गजबजलेल्या चौफुला येथील कला केंद्रात वारी ते बारी हा आगळावेगळा कलाविष्कार फुलला होता तो केवळ वारकरी भक्तांच्या सेवेमुळे .संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या आगमनानिमित्ताने टाळ मृदुंगाचा गजर आणि घुंगरांचा छनछनाट या कार्यक्रमाला एकच रंगत आली होती. हजारो वारकरी भक्तांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. नर्तिकांनी देखील वारकऱ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला .
कला केंद्रात वारकऱ्यांना जेवणाचा आग्रह करून त्यांच्या सेवेत दंग झालेल्या नर्तिकांचे विलोभनीय दृश्य चौफुला येथील अंबिका कला केंद्रातील होते. अर्थात या सोहळ्याला पाठबळ लाभले होते ते कला केंद्राचे मालक डॉ. अशोकराव जाधव , जयश्री जाधव या दाम्पत्यांचे. गेल्या ३५ वर्षापासून या कला केंद्रात पालखी आगमनानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा आहे. वारी आपल्या दारी येणार म्हणून येथील नर्तिका आपला नृत्य व्यवसाय दोन दिवस बंद ठेवून सुमारे तीन हजार वारकरी भक्तांच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी दंग असतात. ऐरवी साज शृंगार करून नृत्य करणाऱ्या नर्तिकांनी मात्र कपाळी अष्टगंध आणि बुक्का लावलेला होता. तर कला केंद्राच्या बाहेर विठ्ठल रुक्मणी यांचा मोठा फलक लावून वारकरी भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. दरम्यान विठ्ठलाच्या ध्वनिफितीने अवघा परिसर दुमदुमला होता.
पालखी आगमनापूर्वी मोठ्या प्रमाणात वारकरी सकाळी कला केंद्रात विसाव्याला होते. सकाळी नऊ वाजता विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेसह ढोलकी घुंगरू आणि टाळ मृदंगाचे पूजन ड जयश्री जाधव आणि कला केंद्रातील नर्तिकांनी केले. यावेळी पांडुरंगाला नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर वारकऱ्यांच्या भोजन पंगत सुरू झाल्या येथील नर्तिका वारकरी भक्तांना आग्रहाने जेवण वाढत होत्या यामुळे वारकरी भक्त देखील सुखावलेला होता. हजारो वारकऱ्यांच्या भोजनानंतर वारकरी पुढच्या पायी प्रवासाला जाताना वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी रस्त्यापर्यंत पर्यंत कला केंद्रातील नर्तिका उपस्थित होत्या. काही नर्तिकांना आनंदाश्रू अनावर झाले वर्षभर घुंगरू आणि ढोलकीच्या सानिध्यात राहणाऱ्या नृत्यांगना पालखी आगमनानंतर काही काळ विठूनामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या सेवेचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
आई-वडिलांची सेवा केल्याचा आनंद
कला केंद्राच्या परिसरात वारकरी आल्यानंतर पुरुष आणि महिला वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर आई-वडिलांची सेवा केल्याचा आनंद मिळतो ऐरवी कला केंद्रातील नर्तिका नाचून थकतात मात्र जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी कधीही आम्ही थकणार नाही.