धायरी : हिंगणे खुर्द येथील अविनाश विहार या सोसायटीच्या बाजूची ओढ्यालगतची संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नसले तरी रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यावर सर्वत्र पाणी साचून तळे निर्माण झाल्याचे चित्र बुधवारी पाहावयाला मिळाले. अशातच हिंगणे खुर्द येथे खोराड वस्ती भागातील सुदत्त संकुलजवळ अविनाश विहार सोसायटीजवळच ओढा आहे. या ओढ्यातील पाणी वाढल्याने अविनाश विहार या सोसायटीच्या सीमा भिंतीत पाणी गेल्याने भिंत बुधवारी दुपारी कोसळली. या सोसायटीत ए, बी आणि सी अशा तीन विंग आहेत. तिन्ही मिळून येथे सुमारे ३६ सदनिका आहेत. ही घटना अविनाश विहार सी विंग येथे घडली असून नागरिकांनी अथक प्रयत्न करून पाणी जाण्यासाठी रस्ता केला त्यामुळे पुढील धोका टळला.
महापालिका जबाबदार असल्याचा आरोप
अविनाश विहार सोसायटीजवळून ओढा वाहतो. महापालिकेच्या माध्यमातून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती; मात्र ओढ्याची स्वच्छता केल्यानंतर राडारोडा तेथेच बाजूलाच टाकण्यात आला. यामुळे वरून येणारे पावसाचे पाणी अडवले गेले त्या दाबाने सोसायटी लगतची भिंत पावसाने पडल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केला. दिवसभर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र दिवसभर कोणीही अधिकारी फिरकले नाहीत. रात्री उशिरा महापालिकेचे कर्मचारी सागर शेळके सोसायटीत येऊन उद्या काहीतरी उपाययोजना करू, असे सांगून गेल्याचे सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले.