बारामती : काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा आहे. या परंपरेचे जे पाईक असतील ते पुढे जातील. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मी काही बोलू शकत नाही. मात्र त्यांची भाजपशी जवळीक आहे असे मला वाटत नाही, असे मत भाजप नेते व वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
बारामती माळेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (दि. ८) बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, शिक्षक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. यावर आमचे विचार मंथन सुरू आहे. सत्तेसाठी काही पण अशी आमची भूमिका नाही तर सत्यासाठी काही पण या भावनेने आम्ही काम करत आहोत. विरोधात असताना संसदीय आयुध वापरून आम्ही जनतेचा आवाज नेहमी बुलंद केला आहे. त्यामुळे शिक्षक पदवीधर निवडणुकीचे आत्मचिंतन करताना आम्ही केवळ जिंकलो किंवा हरलो याचा विचार करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे निवडणुका जिंकणे हे आमचे लक्ष नसून गोरगरिबांचे हृदय जिंकणे हे आमचे लक्ष आहे. चार निवडणुका हरल्या म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये काही गडबड आहे असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते बारामतीत आले की पवारांचे कौतुक करतात. त्यामुळे स्थानिक नेत्यांना पवारांच्या विरोधात लढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशी तक्रार दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्या दरम्यान केली होती. याबाबत माध्यमांनी सुधीर मुनगंटीवार यांना छेडले असता ते म्हणाले, चांगल्या कामाचं कौतुक करणं ही आपली परंपरा आहे. मी एखादे चांगले काम करतो तेव्हा विरोधक असताना ते देखील माझे कौतुक करतात. महाराष्ट्राची ही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा खंडित होता कामा नये. मात्र जी बाजू चुकीची आहे. यामध्ये अन्यायाचा भाव आहे त्याचे समर्थन कोणीही करू नये, असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले.