पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याचा खून करणार्या आरोपींनी गोळीबाराचा सराव करताना ज्या झाडावर गोळीबार केला होता, ते झाडच आता जागेवर अस्तित्वात नसल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शरद मोहोळ याचा खून केलेल्या साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अदित्य विजय गोळे, नितीन अनंता खैरे आणि एका जणांनी मुळशी तालुक्यातील हाडशी येथे गोळीबाराचा सराव केल्याची तपासादरम्यान माहिती दिली होती. त्यांनी हा गोळीबार आॅक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात रात्री १ वाजता केल्याचे सांगितले होते. गोविंद उभे (रा. मुंबई) यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या झाड्याचे बुंध्यावर पोळेकर व इतरांनी मिळून ६ गोळ्या झाडल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व त्यांचे सहकारी मुळशी तालुक्यातील हाडशी येथील ते ठिकाण पाहण्यासाठी गेले होते. पोळेकर व इतर आरोपींनी पोलिसांना ते ठिकाण दाखविले. तेव्हा त्या ठिकाणी ज्या झाडावर फायरिंगचा सराव केला होता, ते झाडच त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.
याबाबत पोलिसांनी जागेचे मुळमालक सचिन अनंत खैरे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी येथील झाड बांधकामादरम्यान सुमारे १० महिन्यांपूर्वी काढून टाकल्याचे सांगितले. याबाबत पुणे पोलिसांनी पौड पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगून त्यामधून फायरिंगचा सराव केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.