आळेफाटा : गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आईचा मृत्यू झाला तर तीचा तरुण मुलगा जखमी झाला. ही घटना नाशिक पुणेमहामार्गावर जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात मंगळवारी १६ जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी प्रतिक कुमार सुनील कवडे (वय-२७,शनीमंदिर मळा,ओझर,ता.जुन्नर,जि.पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मधुकर महादेव वारे (वय-३८,रा.हिरडपूरी,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर) याचेविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतिककुमार कवडे व त्याची आई पुष्पा हे दोघे मायलेक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गाने दुचाकीवरून आळेफाट्याच्या दिशेने येत होते. ते डोंगरे फर्निचरचे समोर असलेल्या गतीरोधकाजवळ आले असता प्रतीकने दुचाकीचा वेग कमी केला. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या ट्रक चालक मधुकर वारे याने त्याचे ताब्यातील ट्रक हयगयीने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात प्रतीकची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस नाईक शिंगाडे हे करीत आहेत.
दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाचा वेग नियंत्रित राहावा, हा गतिरोधक उभारण्याचा उद्देश असला, तरी सदोष आणि अशास्त्रीय पद्धतीने ठिकठिकाणी उभारण्यात आलेले गतिरोधक महामार्गावर वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. आळेफाटा बायपासवर सर्वत्र गतिरोधक करताना लांबी, रुंदी, उतार, उंचवटा या कोणत्याही निकषाचे पालन होत नसल्याचे वारंवार गतिरोधकावर होणाऱ्या अपघाताने समोर आले आहे. त्यामुळे रस्तानिहाय गतिरोधकाचा आकार, लांबी-रुंदी, उतार आणि उंचवटा बदलत असून, गतिरोधक म्हणजे रस्त्यावरील टेंगूळ ठरत आहेत. परिणामी सदोष गतिरोधकांमुळे काहींना जीव गमवावा लागला, तर काही जण कायमचे जायबंदी झाले आहेत.