चाकण: औद्योगिक वसाहतीमधील कंपन्याचे मागील खिडकीचे गज कापून कंपनीतील ३५० किलो वजनाचे तांब्याचे तब्बल चार लाख एकवीस हजार रुपयांचे रोल रिक्षातून येऊन रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या अज्ञात दोन चोरट्यांना अटक करण्यात चाकण पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी पवनकुमारसिंह (मॅनेजर, सासवड हिट ट्रन्सफर कंपनी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक विलास खिल्लारे (वय २७ वर्षे. रा. शांतीनगर भोसरी पुणे मुळ रा. लिंबागणेश पोखरी, ता जि बीड), कबीर लालसींग गौर उर्फ राहूल ( वय. २६ वर्षे, रा. आळंदी फाटा गवते वस्ती चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. आईनाचौडा, कासार, थाना उधारबंद, जि. सिलचर राज्य आसाम ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतीतील सासवड हिट ट्रान्सफर कंपनीचे ( दि.१० ) मागील खिडकीचे गज कापून कंपनीतील ३५० किलो वजनाचे ४,२१००० किमितीचे तांब्याचे रोल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात चोरटयांचा व चोरी गेलेल्या मालाचा शोध घेत असताना चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच घटस्थळावर येणारे जाणा-या रस्त्यावरील त्याच प्रमाणे चाकण परीसरातील सुमारे ५० पेक्षा जास्त ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.त्यावेळी दोन जण हे रिक्षाने येवून कंपनीमध्ये घरफोडी करत असल्याचे दिसून आले. तपास पथकातील उपनिरीक्षक प्रसंन्न जराड आणि पोलीस हवालदार संदीप सोनवणे यांना गोपनिय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील संशयित दोन जण रिक्षामध्ये तांब्याचे रोल घेवून आळंदी फाटा परीसरामध्ये माल विक्रीकरीता ग्राहक शोधत आहेत.सदर ठिकाणी जावून दोन जणांना मालासह व रिक्षासह शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करून सदरचा माल हा त्यांनीच चोरल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदरचे दोनही आरोपी हे प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील असल्याची खात्री झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.