चाकण : खड्ड्यातील पाण्यात खेळत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन सख्या बहीण भावांचा घराजवळील शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खे तालुक्यातील आंबेठाण येथे घडली आहे. ही तिन्ही चिमुरडी मुले अवघ्या ८ ते ४ वर्षांची होती. या तिन्ही चिमुरड्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित जयकिशन दास ( वय.८ वर्षे), राकेश जयकीसन दास ( वय.६ वर्षे )आणि श्वेता जयकीसन दास ( वय.४ वर्षे ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. जयकीसन दास ( मूळ रा.बिहार,सध्या रा.आंबेठाण, ता.खेड ) यांची ही तिन्ही मुले आहेत. जयकीसन दास हा पेंटरची कामे करत आहे. दास हा आपल्या कुटुंबासह आंबेठाण येथील लांडगे वस्ती येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे.
लांडगे वस्तीजवळील शेतात मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्याने खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.ही तिन्ही बहीण भावंडे घराजवळ खेळत असताना ती या खड्ड्याकडे गेली.मुले खेळण्यासाठी पाण्यात उतरली मात्र खेळताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनास्थळी स्थानिक नागरिकांसह महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.