पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतामध्ये बालहत्ती साकारून भात रांगोळी करण्याचा अनोखा संदेश पर्यावरण अभ्यासक डॉ. श्रीकांत इंगळहळीकर यांनी दिला आहे. यंदा ‘रघु’ चित्रपटातील नायक बालहत्तीचे पॅडी आर्ट तयार केले आहे. नागरिकांना ते पाहण्यासाठी उपलब्ध आहे. बियांचे रोपण करून हे चित्र साकार केले आहे.
भारतात पॅडी आर्ट करण्याची पध्दत रूढ नाही. परंतु, ही पध्दत डॉ. इंगळहळीकर यांनी प्रथम सुरू केली. गेल्या काही वर्षांपासून ते शेतामध्ये पॅडी आर्ट तयार करत आहेत. त्यातून दरवर्षी वन्यजीवांचे चित्र साकारतात. त्याविषयी जनजागृती व्हावी, हा त्यामागील हेतू आहे. यंदाच्या भात हंगामात दोन चित्रे सादर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिले बालहत्तीचे साकार केले आहे. हे चित्र बियांच्या पेरणीतून केले असून, 'रघु' हे ऑस्कर विजेत्या लघुपटाचा नायक असलेल्या बाल-हत्तीचे आहे. रघु हा वन्य प्राणी आणि आदिवासी यांच्यातील प्रेमळ नात्याचे प्रतीक आहे. त्याविषयी नागरिकांना माहिती व्हावी म्हणून ते साकार करण्याचे इंगळहळीकर यांनी ठरविले.
ते म्हणाले,‘‘आपल्याकडे भात लावणीची नेहमीची पध्दत असते, तशी मी केली नाही. मी बिया पेरून हे चित्र साकारले आहे. अन्यथा आपल्याकडे अगोदर भाताची रोपं एकत्र तयार करतात आणि नंतर चिखल करून त्यामध्ये खोचतात. मी मात्र वेगळे काही तरी करण्यासाठी बिया लावून त्यात बालहत्ती साकार केला आहे.’’
हे चित्र येत्या २० ऑगस्टपर्यंत सिंहगड रस्ता, डोणजे फाट्याजवळ, लेक्झोन कारखान्याच्या आवारात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हे चित्र कोणालाही पाहता येईल. रोपांच्या लावणीतून केले जाणारे दुसरे चित्र गणपती उत्सवाच्या काळात करण्यात येईल, असे डॉ. इंगळहळीकर म्हणाले.