बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदभार्तील घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे माळेगावला जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, गोविंदबाग निवासस्थानातून बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधत राजीनाम्याचा विषय संपला आहे, आता कामाला सुरुवात करू, असे पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयानंतर देशात भाजपविरोधी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले. पत्रकारांशी बोलताना पवार यांनी
विरोधकांच्या एकजुटीच्या बाबत लक्ष वेधत पवार म्हणाले, युती करण्यासाठी विविध विचारांचे सामाईक कार्यक्रम घेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच विरोधकांची एकजुट होईल. यासाठी आज नितीशकुमार काम करीत आहेत. आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या सर्वांना प्रोत्साहित करणे, सहकार्य करणे महत्वाचे आहेत. पण हे लवकर केलं पाहिजे. कारण यामध्ये निवडणुकीचा उत्साह तयार होईल. कारण निवडणुका जाहिर झाल्यावर सर्व लक्ष तिकडे केंद्रीत होते. त्याच्यापुर्वी पर्यायी लोकांना आपण उभं करु शकलो तर त्याची आवश्यकता आहे. त्या कामात नितीशकुमार यांच्यासह आणखी लोक काम करीत आहेत. त्यांना सहकार्य करणं, प्रोत्साहित करणं, मदत करणं त्यात माझा सहभाग असेल, असे पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान, पवारसाहेब बारामतीला येणार असल्याची माहिती सर्वांना सकाळीच समजली होती. त्यामुळे सकाळपासूनच गोविंदबागेच्या प्रवेशद्वारावर सर्वांनी गर्दी केली होती. पवार यांचे आगमन होताच सर्वांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. देश का नेता कैसा हो, पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,या घोषणांनी परिसर दणाणला.