पुणे :पुणे पोलिसांकडून पालखी सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खाजगी चित्रीकरणासाठी ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगी न घेता चित्रीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पालखीबरोबर मोठा जनसमुदाय असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या पालख्यांच्या आगमन, मुक्काम किंवा मार्गक्रमणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेत असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
चित्रीकरण करायचे असल्यास त्यांना पोलिसांकडे अर्ज करून त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन वापरण्यासंबंधित पूर्व माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. पोलिसांचे आदेश ३० जून पासून ३ जुलै पर्यंत लागू राहणार आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिले आहेत.