पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. याप्रकरणी सदर कारची बंगळुरू आणि पुण्यातील नोंदणी रद्द करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे.
यातील आराेपी बाळ १७ वर्षे आठ महिने वयाचा असून, अपघातावेळी ताेच कार चालवत होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नाेंदणी क्रमांक मिळण्यापूर्वीच ही कार सुमारे १६६ किलोमीटर चालली असल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले. विशेष म्हणजे या कारचा वापर आरोपी बाळच करत होता, हेदेखील सिद्ध झाले आहे.
अपघातग्रस्त पाेर्शे कारची पुण्यातील नोंदणी प्रक्रिया रद्द केली आहे. बंगळुरू आरटीओने देखील त्या कारची तात्पुरती नोंदणी रद्द करावी, असे पत्र पुणे ‘आरटीओ’कडून पाठवण्यात आले आहे. या कारने दुचाकीला धडक दिली, तेव्हा तिचा वेग ताशी १६० किलोमीटर असल्याचेही दिसून आले. याबाबत पोर्शे कंपनीच्या नऊ सदस्यांच्या पथकाने सोमवारी तपासणी केली असून, त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांकडे सोपवला आहे. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी
वेग पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली. यावेळी त्या गाडीचा वेग इतका होता कि डोळ्याची पापणी मिटेपर्यंत पोर्शे कार समोरून पास झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणी अक्षरशः १० फूट उंच उडून खाली पडली. तर तरुण लांब फेकला गेला. क्षणार्धातच दोघांचा जीव गेला. हि घटना पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला होता.