पुणे: कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर दररोज यात नवनवीन खुलासे होत आहेत. अपघाताच्या घटनेनंतर आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात या स्पोर्ट्स कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येत या कारची पाहणी केली होती, तसेच कारमधील डेटा तपासासाठी घेऊन गेले होते. पोर्शे कंपनीने नुकताच पुणेपोलिसांना यासंदर्भातील अहवाल सादर केला. त्यात कारमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कल्याणी नगर परिसरात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांना उडवले होते. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडून प्रयत्न केले जात आहेत. अपघात प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट पोर्शे कार कंपनीच्या अधिकृत पथकाला पुण्यात बोलवून घेत अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली. गाडीची तपासणी करुन गाडीत कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा अहवाल त्यांनी दिला. त्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी वकिलांनी काढलेली पळवाट आता बंद झाली आहे.
गाडीतील सीसीटीव्ही देखील तपासले..
कारमध्ये लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा देखील तपासण्यात आला. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलिस ठाण्यात येत गाडीची तपासणी केली होती. गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबीयांनी केली होती. ही गाडी ऑटोमॅटीक आहे. तपासणीनंतर आम्ही याबाबत माहिती देऊ शकू, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले होते.