पुणे : आमदार अपात्रता प्रकरणात आलेला निकाल हा न्यायालयीन नाही, तर राजकीय निकाल आहे. त्यात परस्पर विसंगती आहे. लवकरच निवडणुका आहेत, आम्ही एकत्रितपणे ही गोष्ट मतदारांना समजावून सांगू, ही मोठीच संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील आणि तिथे त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकालपत्र वाचून होताच पवार यांनी पुण्यातील मोदी बाग या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा अध्यक्षांचे निकालाआधी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणे यावरही पवार यांनी थेट टीका केली.
यावर ‘विधानसभा मतदारसंघातील कामे होती’ या नार्वेकर यांच्या खुलाशावर शरद पवार यांनी हसून उत्तर दिले. “आताच त्यांना कामे आठवली का?” असा प्रश्नही उपस्थित केला; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही असाच वाद नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे, त्यासंदर्भात वारंवार विचारूनही पवार यांनी उत्तर दिले नाही. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाइडलाइनचे पालन झालेले नाही. दोन्ही बाजूंचे आमदार पात्र समजले गेले आहेत, हे कसे? असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला आहे.
पक्षसंघटना महत्त्वाची असे सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निकालात मात्र विधिमंडळ पक्षाला महत्त्व देण्यात आले. पक्षसंघटनेकडून उमेदवारी दिली जाते. व्हीप बजाविण्याचा पक्षसंघटनेचा अधिकारच अमान्य करण्यात आला. तसे असेल तर मग उद्धव ठाकरे गटाचे आमदारही पात्र कसे ठरवले गेले? वकिलांबरोबर चर्चा केल्यानंतर या निकालाची अधिक स्पष्टता समोर येईल. उद्धव ठाकरे याबाबत सर्वोच्च न्यायालयात जातील, तिथे या निकालातील राजकीय हेतू उघड होईल, असेही पवार पवार म्हणाले.
लवकरच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आमच्याबरोबर येत असलेले ॲड. प्रकाश आंबेडकर व अन्य सर्व पक्ष असे मिळून आम्ही मतदारांना या निकालाबाबत समजावून सांगू. आमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे, त्याचा आम्ही वापर करू. निकालाच्या आधी आमच्या काही मंडळींत चर्चा झाली होती. त्यात निकाल असा लागणार, याची खात्रीच व्यक्त केली होती. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष