- राजेंद्र मांजरे
राजगुरूनगर (पुणे) : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या परिसरात तरुणींची छेडछाड करत थांबणाऱ्या रोड रोमिओवरती खेडपोलिसांनी धडक कारवाई केली. त्यांचेकडील ६ बुलेट मोटारसायकलीवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ४८ हजारांचा दंड ठोठवला. मुलांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.
शहरातील महाविद्यालयाच्या बाहेर रोडरोमिओ थांबून तरुणीची छेडछाड करण्यात येते. तसेच तरुणींना पाहून बुलेटचा कानठळ्या बसणारा आवाज काढण्यात येतो. या प्रकारची माहिती खेडपोलिसांना मिळाली होती. पोलिसानी महाविद्यालयाच्या परिसरात नजर ठेवली. या भागात काही मुले दुचाकीवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी काही जण तरुणीचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि थेट पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात येण्याची सूचना देण्यात आली.
पोलिसांनी ६ बुलेट जप्त करून ४८ हजारांचा दंड ठोठवला. तसेच बुलेटचे सायलेन्सर काढून घेतले. या कारवाईत खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस हवालदार संतोष मोरे, सागर शिंगाडे, प्रवीण गेंगजे, संतोष घोलप, शिवाजी नऱ्हे, संजय पावडे, बबन भवारी, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तालुक्यातील ४ हजार मुली शिक्षणासाठी येतात. मात्र, काही रोडरोमिओंमुळे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले होते. यासाठी शिक्षण संस्थाही अशा रोड रोमिओंवर कारवाई करण्यापेक्षा हात वर करण्यातच धन्यता मानत होत्या. मात्र खेड पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने आता अशा रोडरोमिओंवर अंकुश येऊ शकतो.