पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मंगळवारी दुपारी मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली व राजकीय चर्चा सुरू झाली. मोरे खडकवासला मतदार संघात मनसेकडून कार्यरत असल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढण्यास सुरूवात झाली. मात्र ही भेट राजकीय नव्हती तर कात्रज येथील एका मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड वाचवण्यासाठी होती असे मोरे यांनी सांगितले.
मोरे व पवार भेटीचे लगेचच वेगवेगळे राजकीय अर्थ राजकीय वर्तुळातून निघू लागले. मोरे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आहेत. ते खडकवासला मतदारसंघात काही महिन्यांपासून सक्रिय झाले आहेत. तिथून तो लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भावी खासदार म्हणून त्यांचे फलकही कार्यकर्ते लावत असतात. सुप्रिया सुळे याच लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. त्यामुळेच या राजकीय शंकाकुशंकांना जोर मिळाला.
मात्र मोरे यांनी लोकमत बरोबर बोलताना आपली भेट निव्वळ सामाजिक कामासाठी होती असे सांगितले. कात्रज दूध उत्पादक संघाच्या एका ९ एकर मुखंडावर मैदानाचे आरक्षण आहे. असे असताना राज्य सरकारमधील एका बड्या मंत्ऱ्याच्या साह्याने हे आरक्षण उढवून भूंखंडाचा दुसऱ्या कामासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आपला विरोध आहे. मैदान मैदानच रहावे अशी भूमिका आहे. त्यामुळे तुम्हीही या कामाला विरोध करायला हवा असे निवेदन खासदार सुळे यांना देण्यासाठी गेलो होते असा खुलासा मोरे यांनी केला.
तिथे शरद पवार होते. त्यांचीही भेट झाली. निवेदनही त्यांनीच स्विकारले. तुमची भूमिका योग्य आहे. खेळाची मैदाने अशा पद्धतीने दुसऱ्या कामासाठी वापरणे चुकीचे आहे, त्याचा परिणाम शहराच्या क्रिडा संस्कृतीवर होईल असे मत पवार यांनी व्यक्त केले. खासदार सुळे यांनीही आपण याला विरोध करू असे सांगितले असल्याची माहिती मोरे यांनी दिली. राजकारणाची या भेटीत शुन्य चर्चा झाली. त्यामुळे यात सांगण्यासारखे दुसरे काहीच नाही असे मोरे म्हणाले. मी आहे तिथेच चांगला आहे अशा पुस्तीही त्यांनी जोडली.