पुणे : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे एक-दोन नव्हे, तर तब्बल ३१ खासदार निवडून आले होते. लोकसभेत मतांची झाली होती ‘कडकी’, म्हणून विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी त्यांना बहीण झाली ‘लाडकी’. हे आता सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आले आहे. युवकांच्या हातचा रोजगार पळविला, मोठे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजराती चाकरी करायची असेल, तर मग या महायुतीचं करायचं काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला.
महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांच्या प्रचारार्थ कोथरूड परिसरात रॅली काढण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोथरूड येथे त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले “कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ५० वर्षे झाली. तो अजून दिमाखात उभा आहे. मात्र सिंधुदुर्गातील पुतळा अवघे ८ महिने सुद्धा टिकला नाही. हे सगळे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. त्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम जनतेने करावे. भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा भाजपने त्यांच्या पाठीवर वार करून शिवसेना फोडली. जो हे वाईट काम करतो, त्याला माफी नाही.”
दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोकाटे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत कोथरूड भागात पायी व जीपमधून पदयात्रा देखील काढण्यात आली होती.