पुणे : दरवर्षी जून महिन्याच्या १५ तारखेनंतर पावसाला सुरुवात होते. पण यंदा जून संपत आला तरी पाऊस पडला नाही. संपूर्ण राज्यात बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. आषाढी वारीतही वारकऱ्यांकडून पावसासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यात आले. अखेर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरातही खबरदारी म्ह्णून पावसाअभावी पाणी कपात करण्यात आली. जुलैच्या ४ तारखेला शहरात एक दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर दोन दिवसातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुण्यातील चारही धरणात सहा दिवसात तब्बल २१ टक्क्यांनी पाणी वाढले आहे. सतत होणाऱ्या पावसाने पुणे महापालिकेकडून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चार तारखेला चारही धरणे मिळून 3.35 टीएमसी आणि 11.50 टक्के पाणीसाठा होता. आजच्या तारखेला 9.47 टीएमसी आणि 32.48 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजेच सहा दिवसात ६ टीएमसी आणि २१ टक्के पाणी वाढले आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरण ७५ टक्के भरले असून पानशेत ३२. ४१ टक्के, वरसगाव ३० टक्के, टेमघर १८.२९ टक्के भरले आहे. असाच पाऊस सातत्याने पडत राहिला तर खडकवासला लवकरच १०० टक्के भरून जाईल असा अंदाज पाणी विभागाकडून केला जात आहे.
शहरात संततधार पाऊस
पुणे शहरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र गार वातावरण झाले आहे. रस्त्यांवर जागोजागी पाणी साचल्याने दिसून आले आहे. अनेक भागात वाहतूककोंडीला नागरिक सामोरे जात आहेत. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने अनेक भागात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी झाडपडीच्या घटनाही झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आरोग्याची काळजी घ्यावी
शहरात होणाऱ्या संततधार पावसाने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल, डेंग्यू, मलेरिया असे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच गरम पाणी प्यावे, त्रास झाल्यास अंगावर काढू नये, आहाराकडे लक्ष द्यावे ते डॉक्टरांकडून आवाहन करण्यात येत आहे.