इंदापूर : राज्यात सर्वात मोठे असलेले भिमानगर(ता.माढा) येथील उजनी धरण अवघ्या सहा दिवसात मायनस मधून प्लसमध्ये आले आहे. उजणी धरणात सध्या १८.१३ टक्के पाणी साठा झाला आहे. तर या अगोदर उजनी धरण उणे १२.७७ टक्के इतके होते. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणार्या सोलापूर, पूणे, अहमदनगर जिल्हा व परिसरातील शेतकर्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
उजनी धरणाला पाणी पुरवठा करणार्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोणावळा भुशी डॅम, कासारसाई व खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे धरणातील मोठ्या प्रमाणातील अतिरिक्त पाणीसाठा हा इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना व भीमा नदीतून दौंडमार्गे उजनी धरणात येत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याची माहिती उजनी पाटबंधारे कार्यकारी अभियंता आर.पी.मोरे यांनी दिली.
उजनी धरणात दौंडवरून सध्या ७३ हजार ९२६ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. यावर्षी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अवघ्या सहा दिवसात उजणी धरणातील पाण्याची पातळी १८.१३ टक्के वाढली असून सध्या उजनी धरण १२.७७ टक्के प्लसमध्ये आल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली.