पुणे/अहमदाबाद - विमानतळावर नेहमीच सोने तस्करी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत असतात. त्यामुळे, विमानतळावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कार्यरत आणि तत्पर असतात. विदेशांतून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर त्यांची करडी नजर असते. त्यातूनच अनेकदा तस्करखोरांनी लपवलेल्या या-ना त्या मार्गातून ते सोने काढतात. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी कोठेही सोने लवपतात. अहमदाबाद विमानतळावर सफाई कर्मचाऱ्याल असेच फेकून देण्यात आलेले सोन्याचे बिस्कीट सफाई करताना सापडले. या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ते उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
१० रुपयांची नोट सापडली तरी माणूस देऊ की नको किंवा कोणाची असले हा विचारीह करत नाही. याउलट लगेचच ती नोट खिशात टाकून काढता पाय घेतला जातो. मात्र, एका सफाई कर्मचाऱ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या गरीबीतही मनाची श्रीमंती दाखवणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्याचं नेटीझन्सकडून कौतुक होत आहे. चिराग परमार असं या सफाई कर्मचाऱ्याचं नाव आहे.
बीव्हीजे ग्रुपचे प्रमुख हनुमंत गायकवाड यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. 'अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे हाउसकीपिंग कर्मचारी चिराग परमार यांना वॉशरूमची देखभाल करताना 1 किलो सोन्याचे बिस्किट सापडले आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे विमानतळावरील उत्पादन शुल्क अधिकार्यांना परत केले. त्या १ किलो सोन्याची किंमत जवळपास ५० लाख रु. होते. कठोर गरिबीत राहून देखील आत्यंतिक प्रामाणिकपणा आणि अत्युच्च सचोटीचे उदाहरण चिराग यांनी दाखवून दिले.चिरागजी, तुम्हाला माझा सलाम!, अशी फेसबुक पोस्ट गायकवाड यांनी लिहिली आहे. तसेच, मित्रहो, अशा प्रामाणिक, सच्च्या आणि विनम्र सहकाऱ्यांमुळेच BVG ची प्रगती झाली आहे असे मी मानतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गायकवाड यांनी बीव्हीजे ग्रुपचे ऑपरेशन हेड संजय माने यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करुन कृपया रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करा, असेही सूचवले आहे.