पुणे : कोरोना मृतांच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घ्यायचे असल्यास आतापर्यंत संकेतस्थळावरून अनुदानासाठी अर्ज करावा लागत होता. मात्र, हे संकेतस्थळ आता एक मार्चपासून बंद करण्यात आले आहे. याबाबत केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत रितसर शासननिर्णय नसल्याने नव्याने दाखल होणाऱ्या अर्जांसाठी अनुदान मिळेल का, याबाबत शासकीय यंत्रणेतही संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोना मृतांच्या नातेवाइकांना किती व कुणी अनुदान द्यावे यावरून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या. त्यानंतर २०२१ मध्ये हे सानुग्रह अनुदान राज्यांनीच द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार ही रक्कम ५० हजार रुपये असावी, असे निर्देशही दिले. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रित संकेतस्थळ तयार केले. या संकेतस्थळावरूनच हे अनुदान दिले जात होते. मात्र, हे संकेतस्थळ आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा
याबाबत मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले की, असा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आता या अनुदानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर अर्ज करावा लागणार आहे. संकेतस्थळ बंदच राहील व पूर्वीच्या अर्जांबाबत मात्र, कार्यवाही सुरू राहील. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर राज्यात कोरोनामुळे १.४८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. सानुग्रह अनुदानासाठी राज्यात २.६० लाख अर्ज आले. त्यापैकी १.९७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले.