पुणे: रात्री स्मशानात कोणालाही जायची हिमत होत नाही, पण ते गेले आणि तिथे चक्क जेवण केले, गाणी म्हटली, स्वच्छता माेहिम राबविली. हे सर्व करत असताना त्यांना कोणालाही भूते दिसली नाहीत. त्यांनी साद देखील घातली. पण भुतांचा मागसूसही लागला नाही. त्यामुळे स्मशानात भुते नसतातच, हेच दाखविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अख्खी रात्रच स्मशानात काढली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापूर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उरुळी कांचनजवळील भवरापूर गावच्या स्मशानभूमीत अंनिसचे पन्नास कार्यकर्त्यांनी हा उपक्रम नुकताच राबवला. हे सर्वजण मुक्कामी स्मशानभूमीत राहिले, तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले. भूतांची माहिती जाणून घेतली. त्यांना साद घातली, पण भुते काही दिसली नाहीत. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समाज काही खरा ठरला नाही. मात्र इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.
भुताची कल्पना मानगुटीवरून काढा
‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.