बायको नांदायला येत नाही म्हणून कुरकुंडी (ता.संगमनेर) येथील युवकाने चक्क टॉवरवर चढून आंदोलन केले. केशव काळे (२२ वर्षे) असे या आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (१९ मे) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
जोपर्यंत पत्नी बरोबर येत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने उपस्थितांना सांगितले. सोबत दोरीही नेली होती. या आंदोनलामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरुण सायंकाळी चार वाजता टॉवरवरून खाली आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केशव काळे या युवकाचे गोद्रे(जुन्नर) येथील मुलीसोबत डिसेंबर २०२१ मध्ये कुरकुंडी घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी गोद्रे येथे आई वडिलांकडे राहण्यास आली. गुरुवारी हा युवक तिला सासरी नांदण्याकरीता घेऊन जाण्यास आला असता पत्नीने सोबत येण्यास नकार दिला, त्यानंतर केशव काळे हा युवक थेट टॉवरवर चढला.
या तरुणाची बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपली मागणी पूर्ण व्हावी म्हणून थेट पिंपळगाव सिध्दनाथ गावातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला. याबाबत येथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो खाली उतरला. केशवने यापूर्वी देखील गोद्रे गावच्या डोंगरावर चढून उडी मारण्याची धमकी दिली होती. तसेच केशवच्या विरोधात आम्ही तक्रार अर्ज दिले असल्याचे केशवच्या सासू-सासरे यांचे म्हणणे आहे.