शगुप्ता शेख
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर आज सकाळी एका महिलेचा रेडी मिक्स सिमेंट टँकर खाली चिरडून मृत्यू झाला. धायरी आणि वडगाव मध्ये सिमेंट काॅंक्रिट तयार करणारे सिमेंट प्लांट आहेत. या प्लांट मधून नेहमी भरधाव वेगाने मिक्स सिमेंट टँकर चालवले जातात. काहीदा टॅंकर चालक मद्यपान करून टॅंकर चालवतात. त्यामुळे यापूर्वीही अपघात झाले आहेत. पुणे सिंहगड रोडवरील प्रयेजा सिटीजवळील आरएमसी प्लांटमध्ये एका महिलेला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना ६ जून (गुरुवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
स्थानिक नागरिकांनी पुणे शहर पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक अपघातस्थळी पोहोचले. मात्र मृत महिला बांधकाम कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. ट्रकचालक फरार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक प्रयेजा सिटी परिसरात बेकायदेशीर सिमेंट प्लांटमुळे रस्त्यावर पसरलेली खडी आणि धूळ यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. यामुळे तेथील रहिवाश्यांना, लहान मुलांना डोळ्यांचा आणि श्वसनाच्या त्रास होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि प्लांटचालक यांचे संगनमत करून कोणतीही अडचण नसल्याचे भासवत असल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केलाय. प्रयेजा सीटीतील रहिवाशांना तेथील बेकायदेशीर रेडीमिक्स यांच्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याचे वारंवार लेखी तक्रार देऊन हि कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई न होत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय. याबाबत 2021 मध्ये स्थानिक नगरसेवकांपासून ते महापौर, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष आणि मेलद्वारे तक्रार केली होती. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येत बॅनर लावून आंदोलनही केले. त्यानंतर त्याच भागात आणखीन एक नव्याने प्लांट सुरू केल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
मी प्रयेजा सोसायटी मधला रहिवासी आहे. महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाकडे तक्रार केली आहे. याठिकाणी ६, ७ प्लांट आहेत त्याचे मोठे प्रदूषण होतंय. आज सकाळी ट्रकच्या एका महिलेला जीव गमवावा लागला. यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कारवाई करावी - एक रहिवासी, प्रयेजा सोसायटी