पुणे : कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवून विदेशातील गिफ्ट आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका महिलेला ६ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी मांजरी बुद्रूक येथील एका ५१ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेहा शर्मा नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० ते २६ ऑक्टोबर या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या गृहिणी आहेत. त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्याने भारतात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेसोबत ओळख निर्माण केली. त्यानंतर मैत्री झाल्यानंतर विदेशातून ज्वेलरी व परदेशी चलनाचे पार्सल पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर नेहा शर्मा नावाच्या महिलेने फिर्यादी महिलेला फोन करून ती कस्टम विभागातून बोलत असून, तुमचे परदेशातून पार्सल आल्याचे सांगितले. तसेच ते पार्सल सोडवून घेण्यासाठी क्लिअरन्स, जीएसटी मनी लाँडरिंग अशी विविध कारणे सांगून फिर्यादींना पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी महिलादेखील आरोपीच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी वेळोवेळी विविध बँक खात्यावर ६ लाख ६० हजार रुपये पाठवून दिले. मात्र कालावधी गेल्यानंतरदेखील न कोणत्याही प्रकारचे गिफ्ट आले नाही. त्यानंतरदेखील सायबर चोरटे महिलेला पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.