पुणे : रोजंदारीवर काम मिळेल, आशेने त्या मजूर अड्ड्यावर उभ्या असत. कामासाठी रिक्षातून जुन्या कात्रज बाेगद्या पलीकडे घेऊन जाऊन चौघांनी या मजूर महिलांच्या अंगावरील मणीमंगळसुत्र, रोकड असा ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने पळविला. याबाबत कात्रज येथील गोकुळनगर येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चौघा जणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी व एक महिला कामासाठी कात्रज चौकातील मजूर अड्ड्यावर उभ्या होत्या. तेथे एक जण आला. त्याने खेड शिवापूर येथे बांधकामासाठी माल देण्यासाठी दोन महिला पाहिजे असे सांगितले. त्या तयार झाल्यावर त्याने आणखी तीन कामगार आहेत, असे म्हणून त्यांना एका सहा आसनी रिक्षातून जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे नेले.
वाटेतच गाडी थांबून त्यांना उतरविले. कामाच्या ठिकाणी चला असे म्हणून डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नेले. फिर्यादी यांनी गळ्याभोवती बांधलेला रुमाल त्याने मागितला. त्यांनी रुमाल काढून दिल्यावर ते त्यांच्या गळ्यातील दागिन्यांकडे पहात होते. त्यांना संशय आला. तेवढ्यात चौघांनी दोघींच्या गळ्यातील मंगळसुत्र, चमकी, कर्णफुले व ८ हजार रुपये रोकड असा ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी आता पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करीत आहेत.