जुन्नर : तीर्थक्षेत्र पारुंडे येथील ब्रम्हनाथ महाराज यात्रामहोत्सवात धार्मिक परंपरेचे वैशिष्ट्य असलेल्या गाडीबगाड महोत्सवात गाडीबगाडाचे लाकडी 'शेले ' तुटुन झालेल्या अपघातात बगाडाला लटकलेले शेलेकरी किरकोळ जखमी झाले. गाडीबगाडाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी असते परंतु सुदैवाने दुर्घटना टळली आहे.
तीर्थक्षेत्र पारुंडे येथील ब्रम्हनाथ महाराजांच्या यात्रामहोत्सवात काटेडे येथील चिलप कुटुंबियांचे मानाचे नवसाचे गाडीबगाड नेण्याची परंपरा आहे. ब्रम्हनाथ महाराजांच्या दर्शन घेतल्यानंतर गाडीबगाडावरील शेले फिरवीत असताना बगाडाचे जुने झालेले शेले तुटल्याने लटकलेले शेलेकरी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अंगावर कोसळले. संदीप चिलप व सुनील चिलप हे शेलेकरी यात किरकोळ जखमी झाले. काटेडे येथील चिलप कुटुंबातील बैल हरविल्याने बैलांचा शोध लागण्यासाठी ब्रम्हनाथ महाराजांना गाडीबगाड नेण्याचा नवस केला करण्यात आला होता. बैलांचा शोध लागल्याने गडीबगाड नेण्याची परंपरा सुरू झाली. अशी गाडीबगाडाची आख्यायिका सांगितली जाते. असे भरत चिलप यांनी सांगितले. यासाठी चिलप कुटुंबीय प्रतिवर्षी चैत्र चोदस तिथीच्या दिवशी गडीबगाड नेण्याची परंपरा पाळत आहे. गाडीबगाडावर लाकडी शेल्याला चिलप कुटुंबातील दोन शेलेकरी लटकलेले असतात. तर गाडीबगाडावर पारंपरिक पेहराव्यात वीर उभे असतात.